कोल्हापूर (प्रतिनिधी) दि. 16 : राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबाला आज साकडे घातले. जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री श्री. पाटील यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. १ या मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, राज्यातील जनता सुखी, समाधानी रहावी, असे सांगून प्रशासनाने या यात्रेचे नेटके आणि चोख नियोजन केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले. त्याचबरोबर भाविकांनी ही यात्रा संयमाने आणि शांततेत पार पाडावी, असे आवाहनही केले. जोतिबाच्या नावानं चांगभल... च्या जयघोषात महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत उंच सासन काठ्या नाचवत देहभान विसरुन सामिल झाले होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा पार पाडल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही श्री जोतिबाचे दर्शन घेऊन, महाराष्ट्र राज्य हे देशात क्रमांक एकचे राज्य व्हावे, असे साकडे श्री जोतिबा चरणी घातले.
या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, सांगलीच्या मनिषा दुबुले, प्रांताधिकारी आमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, सहसचिव शीतल इंगवले, दीपक म्हेतर, श्री चे पुजारी यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते.
Promoted Content :
🔴 आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.
🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?
🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!