परीक्षा हे जीवनाचे अंतिम ध्येय असू शकत नाही आपण आजन्म विद्यार्थीच असतो : दत्तात्रय देवकर

 

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने शुभेच्छा समारंभ संपन्न...

वारणानगर / प्रतिनिधी : दि. ११ जानेवारी  :-

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले. मा. दत्तात्रय देवकर (टाटा मोटर्स, पुणे) हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. विभागाचे प्रमुख दिलीप खोत, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. 

देवकर यांनी विद्यार्थ्यांना 'अपयशाकडून यशाकडे'या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले."परीक्षा हे जीवनाचे अंतिम ध्येय असू शकत नाही, आपण आजन्म विद्यार्थी असतो. कोणताच विषय अवघड असत नाही, आपण समजून घेण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे. परीक्षेची भीती न बाळगता हसत खेळत शिक्षण घेणे शक्य आहे"असे मत त्यांनी मांडले. 15 पेक्षा अधिक वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होऊनही आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात आपण ध्येय कसे गाठले, हे विनोदी व मार्मिक शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कविता, नाट्य ,विनोद, कोडी यांचा वापर करत अभ्यास करताना स्मरणसाखळी कशी तयार करावी याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले. बाबा, आई, गुरु ह्या दोन अक्षरी शब्दांचे मोल जाणण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. मोबाईल आणि चित्रपटांच्या विळख्यात सापडलेल्या युवा पिढीला वास्तवाचा कसा विसर पडतो आहे, हे सैराट चित्रपटाचे नवीन कथानक रचून त्यांनी पटवून दिले.

अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. गरिबीला ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील अडसर न बनवता ध्येयप्राप्तीसाठी कसे प्रयत्न करावेत, हे स्वानुभवातून पटवून दिले. समाजातील वाढत्या सामाजिक ,आर्थिक विषमतेचे वास्तव सांगून येणाऱ्या काळात कौशल्यपूर्ण आणि अद्ययावत ज्ञान किती मोलाचे आहे याविषयी चिंतन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मनोबल वाढवणारी उदाहरणे देऊन यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एम.ए. सुतार यांनी केले.  श्री. डी.ए. खोत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. समृद्धी पाटील या विद्यार्थिनीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. श्री .व्ही.आर. निवर्गी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन सौ. व्ही.पी. रजपूत यांनी केले.



 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post