मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर होणार स्वच्छ...सुंदर...!

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर होणार स्वच्छ...सुंदर...!
प्रशासकीय इमारत परिसर पहाणी करताना जिल्हाअधिकारी.

कोल्हापूर (प्रतिनिधी) :मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शासकीय कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. या परिसरातील वाहनतळ व्यवस्था, पाणी पुरवठा व स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अशा सूचना करुन मध्यवर्ती प्रशासकीय परिसर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी  आवश्यक कामांचा आराखडा तात्काळ सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये वाहनतळ व स्वच्छतेबाबत येणाऱ्या अडचणींबाबत आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयात बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

यावेळी नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रसाद गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, कागल-राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, संजय गांधी योजना (शहर)च्या तहसिलदार मैमोनीसा संदे, तहसीलदार वैभव पिलारे, सहायक अभियंता वैभव जाधव, सहायक संचालक माहिती फारुख बागवान, माहिती अधिकारी वृषाली पाटील आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी राधानगरी उपविभागीय कार्यालय, नगररचना, अन्नधान्य वितरण, सह दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक, अपर उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयांना भेटी देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कार्यालयीन कामानिमित्त दिवसातील बराच वेळ आपण कार्यालयाला देतो. यामुळे आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. परिसरातील नादुरुस्त वाहने, अनावश्यक साहित्य निर्लेखित करुन परिसर मोकळा करा. इमारत परिसरात सावली देणाऱ्या झाडांबरोबरच छोटी व आकर्षक रोपे लावून परिसर सुशोभित व सुंदर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 
                                                           

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले की, इमारत परिसरात नियमित साफसफाई ठेवा. पथदिवे दुरुस्त करुन विद्युत व्यवस्था सुरळीत करा, पाण्याच्या मोटर बसवा, कार्यालयांची पाण्याची गरज पाहून आवश्यकता भासल्यास कूपनलिका घ्या, पण 24 तास पाणी पुरवठा होईल, याची दक्षता घ्या. अभ्यागत व कामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था करा. सार्वजनिक जागेतील स्वच्छतेसाठी येणारा खर्च सर्व कार्यालयांनी मिळून भागवावा.  परिसरातील वाहनतळ व्यवस्था, पाणी पुरवठा व स्वच्छता राखण्यासाठी येथील सर्व कार्यालय प्रमुखांची 'इमारत देखभाल दुरुस्ती समिती' बनवून त्याव्दारे चोख व्यवस्था करा आणि मध्यवर्ती प्रशासकीय परिसर स्वच्छ, सुंदर ठेवा, अशा  सूचना त्यांनी केल्या.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूच्या परिसराचे सपाटीकरण करुन या जागेत पार्किंगसाठी व शासकीय कार्यालयांसाठी इमारत बांधण्यासाठी नियोजन करा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.



Promoted Content :

🔴 शेतकऱ्याला तिप्पट अनुदान देणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना |शरद पवार ग्रामसमृद्धी योजना|

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 २०२३ ला व्हिजन ग्रीन काखे करणार : अभिजित सातवेकर...








Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post