महाबळेश्वरतील मांघर देशातील पहिले मधाचे गाव.

२० मे जागतिक मधमाशा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
   

२० मे जागतिक मधमाशा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
'मधाचे गाव' म्हणजे स्वयंपुर्ण गावाची संकल्पना 

महाबळेश्वर : महात्मा गांधीनी खेड्याकडे चला अशी हाक दिली होती. खेडी स्वयंपूर्ण स्वावलंबी झाली तरच भारताचा विकास होईल असेही महात्मा गांधी म्हणत त्यासाठी त्यांनी स्वदेशीची चळवळ देखील सुरु केली या चळवळीचा एक भाग होता चरखा...सुत कताई ते कापड असा प्रवास असणारा हा चरखा लोकांना रोजगार देण्याबरोबर देशप्रेम देखील जागृत करीत होता.आज खेड्यांची झालेली दुरावस्था अन शहरीकरणामुळे शहारांचे झालेली ओंगळवाणे चित्र पाहता पुन्हा एकदा खेड्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न करणे गरजे चे आहे. 

मधाचे गाव हा प्रकल्प गावांना स्वावलंबी व पर्यावरणपुरक ठरु शकतो. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील साठ वर्षापासून मधमाशा पालन संदर्भात कार्यरत आहे. मधमाशांचा विकास व विस्तार व्हावा या उद्देशाने १९५७ साली मध संचालनालयाची स्थापना देखील महाबळेश्वर ला करण्यात आली आहे. मधमाशांची घटती संख्या संपुर्ण सजिव सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांसाठी घातक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाशांचे कार्य अनन्यसाधारण असेच आहे. आज जागतिक स्तरावर देखील मधमाशांच्या संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. 

मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, जंगल व  डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा ,कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटन ही संकल्पना रुजावी या मुख्य उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंन्शू सिंन्हा यांनी 'मधाचे गाव' ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला साकरण्यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाने मांघर हे मधाचे गाव तयार केले आहे. 

 

मांघर' या महाबळेश्वर तालुक्यातील गावाची निवड 'देशातील पहिले मधाचे गाव' म्हणून करण्यात आली आहे. या बाबतचा शुभारंभ काल  राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, खादी व ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंन्शु सिन्हा यांच्या उपस्थितीत झाला. मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के लोक मधमाशापालन करीत आहेत. या गावाच्या आजूबाजुला घनदाट जंगल असून वर्षभर राहणारा फूलोरा आहे. या गावाने आज अखेर शासनाचे जवळपास दहा पुरस्कार मिळवले आहेत. स्वातंत्र्य नंतर आज पर्यंत या गावात निवडणूक झाली नाही.

सुंदर स्वच्छ असणाऱ्या या गावात मधमाशांमुळे समृद्धी आली आहे. या सगळ्याचा विचार करुन मांघर गावची निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर ला येणारे लाखो पर्यटक या गावाला भेट देऊन येथील मधपाळांनी संकलीत केलेला शुद्ध मध चाखणार आहेत. या गावात सामूहीक मधमाशांचे संगोपन केले जात आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्याकडे कमीत कमी दहा मधमाशांच्या पेट्या आहेत. मधमाशांच्या पासून मध मेण व इतर उत्पादने तयार करण्यासाठी या गावात मधमाशांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. संकलीत केलेला मध गावच्या ब्रँन्डने विकला जाणार आहे. गावात मधमाशांची माहीती देणारे फलक लावण्यात येणार असून संपुर्ण गाव मधमाशांच्या  विविधतेने सुशोभित केले जात आहे.

मधमाशांच्या माध्यमातून गावातील शेती ला सेंद्रीय प्रमाणिकरण करून  आणि लोकांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजना मांघर गावात प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. नुकतेच वन विभागाच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. शेतीपिकांवर दिंवसेंदिवस वाढत असलेली रासायनिक किटकनाशके आणि खते यांच्या प्रभावाने मित्रकिडी आणि मधमाशांसारखे किटक नाश पावत आहेत या बाबतची जनजागृती करण्यासाठी मधाच्या गावाचे नियोजन केले आहे. 'मधाचे गाव' ही संकल्पना केवळ मांघर पर्यत सिमीत नसून राज्यातील इतर जिल्हात देखील राबविण्यात येणार आहे. मधमाशांच्या परपरागिकरणामुळे शेतीपिक उत्पादनात भरघोस वाढ होत असते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळण्यासाठी 'मधाचे गाव' हे मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आहे. मध संचालनालयाच्या वतीने हे मांघर हे गाव आता मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. या गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाबळेश्वर ला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध यामुळे ग्राहकांना मिळणार आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असुन राज्यातील इतर जिल्हात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

मधमाशा संवर्धना बरोबरच निसर्ग संवर्धनाचा प्रकल्प लोकाभिमुख होइल.

                                                                                                                   बिपीन जगताप.
                                                                                                उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मध उद्योग )
                                                                                                         खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई.





















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post