वारणानगर ता. पन्हाळा येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिना निमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर

वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिना निमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ.सौ. वासंती रासम (उच्च शिक्षण,संशोधन आणि प्रशासन), डॉ. प्रीती शिंदे- पाटील (वकृत्व,शिक्षण आणि साहित्य), डॉ.प्रीती वळगड्डे (आरोग्य आणि सेवा) तर सौ. वृषाली धर्मे-पाटील (वकृत्व,कला आणि उद्योग) यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन आप आपल्या क्षेत्रात नाव कमावल्या बद्दल प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह,मानाचा फेटा आणि गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम म्हणाल्या की," वारणा नगरीमध्ये महिला आणि मुलींच्या कार्यकर्तृत्वाला एक निश्चित दिशा देण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात यावे. महिलांना सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी मोबाईल सारख्या माध्यमाचा उपयोग गरजे पुरता मर्यादित करावा. महाविद्यालयांमधील दोन माजी विद्यार्थिनी स्वकर्तुत्वावरती उच्चपदस्थ झाल्याबद्दल आणि त्यांची निवड करून सन्मान केल्याबद्दल प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांना त्यांनी धन्यवाद दिले. तात्यासाहेबांच्या वारणा नगरीत समाजसेवेचे, गुणगौरवाचे अनेक नवीन नवीन उपक्रम राबविली जातात. या वर्षापासून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान उपक्रम राबवून एक नवा   प्रेरणादायी मार्ग शोधल्याचा त्या म्हणाल्या. डॉ. प्रीती शिंदे-पाटील यांनी, "अनेक अडचणीवर आणि परिस्थितीवर मात करीत नव्या पिढीला आदर्शवत घडवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. कष्टाची तयारी ठेवली तर काहीच अशक्य नसल्याचे त्या म्हणाल्या."

डॉ. प्रीती वळगड्डे म्हणाल्या की, "वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न माझ्यासमोर दिसून येत आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी जीवनाचे ध्येय निश्चित करावे. त्यासाठी सातत्याचा ध्यास घ्यावा."

सौ. वृषाली धर्मे-पाटील म्हणाल्या की, "मर्यादित परिस्थितीत स्त्रियांना सर्वच क्षेत्रात उज्वल कामगिरी करण्याची संधी आहे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता यशोशिखरावर पोचण्यासाठी अनेक अनेक क्षेत्रं उपलब्ध आहेत. "

समारंभ संयोजक प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की," जगभर महिलांना समानतेची वागणूक आणि अधिकार मिळावा या उदात्त हेतूने जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त काही भव्यदिव्य करून दाखवण्याच्या ऐवजी आपल्याच परिसरात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अतिउच्च शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करून समाजासाठी काही करणाऱ्या महिलांना आपल्यासमोर आदर्श म्हणून उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे.  आपल्याच गाव परिसरातील मुलींनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन नवनवीन क्षेत्रात वारणा परिसरातील मुली आणि महिलांनी आदर्शवत कामगिरी करून दाखवावी", असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये नारीशक्ती, महिला सबलीकरण, देश निर्मितीमध्ये महिलांचे योगदान, नारी सुरक्षा इत्यादी विषयावर छात्रसैनिकांनी चित्रे काढून सादर केली.

या कार्यक्रमाचे संयोजन कॅप्टन डॉ. एस एस खोत यांनी केले. अंडर ऑफिसर दीप्ती पाटील,सार्जंट नम्रता गुरव, लांस कारपोरल ऋतुजा गावडे, अंकिता पाटील, ऋतुजा खांडेकर, संध्या हांडे, सोनाली घाडगे, भावना संकपाळ इत्यादी छात्रसैनिकांनी सहभाग नोंदवला. 

प्रारंभी समारंभात उपस्थित कर्तुत्ववान महिलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा संध्या साळोखे यांनी केले. समारंभ यशस्वी करण्यासाठी डॉ. सी. आर. जाधव, डॉ. एस. एस. जाधव, सौ. डॉ. प्राजक्ता आहुजा, प्रा. सीमा काटकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post