विनय कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा स्वप्नील सुनील पाटील सार्वजनिक बांधकाम राज्य सेवा परीक्षेत राज्यात प्रथम.


वारणानगर ता. पन्हाळा येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हान वारणा महाविद्यालय अंतर्गत सुरू असलेले विनय कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी स्वप्नील सुनील पाटील यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता( श्रेणी-१)सार्वजनिक बांधकाम राज्य सेवा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले. आज मार्गदर्शन केंद्राचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर यांनी शाल आणि बुके देऊन यांचा सत्कार केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील मिळवलेले यश अभिमानास्पद असल्याचे मत आमदार कोरे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. बी. एस. शिर्के, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही आणेकर, स्थापत्य विभागाचे प्रमुख धनराज पाटील,प्रा. एस. व्ही राजू, दादासो बच्चे, भालचंद्र शेटे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रशासकीय अधिकारी डॉक्टर वासंती रासम यांच्या हस्ते स्वप्नील पाटील यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.               

 आपल्या यशाबद्दल बोलताना स्वप्नील पाटील म्हणाले की,"२०१७ साली तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्यशास्त्राची पदवी प्राप्त केली. खाजगी कंपनीत नोकरी करण्यात काही अर्थ नाही असा अनुभव आल्यामुळे दररोज सरासरी दहा तासांपेक्षा जास्त वेळ विनय कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास केला. सेंटर मधून मिळणाऱ्या ज्ञानातून मूळ संकल्पना समजून घेतल्या आणि काही अनुभवी मित्रांच्या समवेत गटचर्चा करून सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत गेलो त्याचा मोठा फायदा झाला."

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम म्हणाल्या की, "इंटरनेटच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे सोयीचे झाले असले तरी मूळ पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा आवाका विचारात घेऊन गटचर्चांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय समजून घ्यावेत, अभ्यासातील सातत्य, स्वतःतील क्षमतांची ओळख करून घेऊन ध्येय निश्चित करण्याचे आव्हानही त्यांनी केले."समन्वयक डॉ. बी. एस. शिर्के यांनी केंद्राच्या सहा विद्यार्थ्यांनाही याच क्षेत्रात यश मिळालेले असून त्याची घोषणा होणार असल्याचे सांगून आभार मानले.

                                                                           








 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post