हरित क्रांतीचे प्रणेते कै.श्री. बापूसाहेब जमदाडे (तात्या)

 हरितक्रांतीचे प्रणेते कै.श्री. बापूसाहेब जमदाडे (तात्या ) 



हजारो कुणब्यांचा पोशिंदा अशी जगी ख्याती, संपूर्ण आयुष्य वेचले बळीराज्याच्याच हितासाठी”

“कठीण प्रसंगांचा करूनी खंबीरपणे सामना, खडकांमधूनी फुलवलात  वनराईचा मळा

         महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छञपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, एका सामान्य कुटुंबात असामान्य कर्तृत्व बजावणारे व्यक्तिमत्व कै. केशव जमदाडे व अनुसया जमदाडे या शेतकरी दांपत्याच्या पोटी २४-५-१९४३ रोजी जन्मलेले पुञरत्न अर्थातच बापूसाहेब जमदाडे (तात्या) आपल्या आई वडिलांबरोबरच आपल्या भागातील शेतकऱ्याचं पिण्याच्या पाण्यासाठी तसेच कोरडवाहू खडकाळ शेतजमिनीसाठी चाललेल्या हालअपेष्टांचा जीवन संघर्ष तात्यांना लहानपणापासूनच असह्य वेदना देत असायच्या. तात्यांच्या कुटुंबात तात्यांचे आई वडील, पाच बहिणी व तात्यांसह दोन भाऊ राहत असायचे. एवढ्या मुलांचा सांभाळ करत असताना तात्यांच्या आईवडिलांना तारेवरची कसरत दररोजच करावी लागायची. प्रत्येक लहानसहान गोष्टींसाठी करावा लागणारा संघर्ष तात्यांनी जवळून अनुभवलेला होता.

       कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून इतिहास विषयाची पदवी घेतल्यानंतर तात्यांनी सर्वसामान्य माणसांच्या समृद्ध विकासासाठी शिराळा तालुक्यातील रिळे व पन्हाळा तालुक्यातील कोतोली या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी केली. मुळातच बंडखोर स्वभावाच्या तात्यांनी शिक्षकांच्या पगाराच्या प्रश्नांवर त्यावेळी शाळेच्या व्यवस्थापनाविरूद्ध जाऊन बंड पुकारले होते. या बंडामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचा फायदा झाला मात्र त्यांना स्वतः ला मात्र नोकरीला मुकावे लागले. यानंतर तात्यांनी माले व आजूबाजूच्या परिसरातील तरूणांची संघटना बांधायला सुरूवात केली. परिसरातील जुन्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली व उत्साही समकालीन सहकाऱ्यांच्या मदतीने तात्या विविध सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करू लागले. यातूनच परिसरात एक अभ्यासू नेतृत्व घडू लागले. त्याकाळी तात्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रही सूर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून उमटू लागला. मात्र तात्या नावाचे हे वादळ पुढे आपल्याला जड जाणार हे त्यावेळच्या कारभारी मंडळींनी ओळखून त्यांना चाणाक्षपणे के. डी. सी. बॅंकेच्या सेवेत दाखल केले. के. डी. सी. बॅंकेमध्ये तात्या डि. ओ. होते. या ठिकाणीसुद्धा तात्यांनी आपल्या कामातून जिल्हाभर स्वतः च्या जिव्हाळ्याची माणसे निर्माण केली. 

        जिल्हा बॅंकेच्या सेवेत असतानाच तात्यांच्या मनी विचार आला की, आपण राहत असलेल्या माले परिसरात डिसेंबर नंतर पिण्याच्या पाण्यासाठी मोताद असतो आणि कोरडवाहू शेतजमिनीमुळे शेतकऱ्यांचेही दैन्य काही संपता संपत  नाही. या विच्यारांच्या कल्पनेला त्यांनी कै.श्रीपती बाबा पाटील, कै.महिपती नाना पाटील, कै.हिंदूराव ज्ञानू पाटील, कै. बाबू हरी पाटील यांच्या समोर तात्यांनी शेतीच्या पाण्यासाठी योजना करण्याची विचार कल्पना मांडली. या विचार कल्पनेतूनच शेतीला पाणी देण्यासाठी गाव ओढ्यावर छोटीशी योजना सुरू करण्यात आली पण गाव ओढ्याचे पाणी  बारमाही नसल्यामुळे ही योजना अधिक व्यापक करण्याची चर्चा सुरू झाली. पुढे तात्यांनी स्वतः च्याच शेतजमिनीत पाच विहिरी खणल्या परंतु त्या पाचही विहिरींना पाणी न लागल्याने वारणा नदीवरून उपसा सिंचन या योजनेचा विचार पुढे आला. शहापूर, माले, पोखले, केखले ह्या गावातील लोकांना एकञ करून १९८८ ला श्री. जय भवानी सहकारी पाणी पुरवठा संस्था माले या ठिकाणी स्थापन केली. तत्कालीन आमदार यशवंत एकनाथ पाटील यांनी शासन दरबारी या योजनेची गरज पटवून दिल्यामुळे तत्कालीन  मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी तात्काळ योजनेला  पाणी परवाना मंजूर करून दिला.

        श्री. जय भवानी सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या उभारणीसाठी लागणाऱ्या भाग भांडवला करता तात्यांना जमीन तारण देऊन भाग भांडवलाची उभारणी करावी लागली. बॅंकींग क्षेञातील अभ्यास असल्यामुळे बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे व कर्ज माफी कशी मिळवायची हे त्यांना ज्ञात होते. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना तयार करणे, योजनेच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर करणे यासाठी तात्या अहोरात्र झटले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे असंख्य अडचणी नंतर योजना कार्यान्वित झाली. परंतु वीजबीलाच्या थकबाकी मुळे योजना पुन्हा रखडली. याच दरम्यान तात्या ज्या भूविकास बॅंकेचे  संचालक होते त्याच बॅंकेतून योजनेसाठी त्यांनी कर्ज उचलले होते. संस्था चालू होण्यास विलंब झाल्याने बॅंकेने कर्जवसुलीचा तगादा लावला. परंतु बॅंकेची कर्ज वसुलीची पद्धत वेगळी असल्याने त्यांच्याकडे तात्यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला पण बॅंकेने दाद न दिल्याने संस्थेस कोर्टात जाणे भाग पडले. त्यामुळे २००६ ला कर्जवसुलीस स्थगिती मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये शासनाची मोठी कर्जमाफी झाली त्यामध्ये पाणी पुरवठा संस्था धरल्या नाहीत. त्यामुळे प्रा. एन. डी. पाटील तात्या, डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांचे समोर १८ दिवसाचे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात तात्या त्यांचे सर्व सहकारी, जय भवानी सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रात सर्व गावांमधील शेतकरी व महिला यांचा समावेश होता.

प्रा. एन. डी. पाटील, मा. आमदार यशवंत एकनाथ पाटील, आमदार डॉ. विनय रावजी कोरे (सावकर साहेब), मा. विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, मा. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कर्जमाफी करण्यासाठी सहकार्य लाभले. 

         १८ दिवसाचे ठिय्या आंदोलन केले ह्यात तात्यांना व सर्व सहकाऱ्यांना यश आले. त्यानंतर पाणी पुरवठा संस्थांना कर्ज माफी मिळाली पण कर्ज माफीतून राहणाऱ्या रक्कमेवर १०%व्याजाची आकारणी केली पण विद्यमान चेअरमन सचिन जमदाडे (काका) व संचालक मंडळाने एक रक्कमी कर्ज फेडणार आहे असे सांगून मा. विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनी १०% वरून ६% वर व्याजाची आकारणी करून ३ कोटी ६५ लाख रक्कम भरून संस्था कर्जमुक्त केली. अपयशावर मात करण्याऱ्या श्री. जय भवानी सहकारी पाणी पुरवठा संस्थेस पन्हाळा परिसर पञकार महासंघाने आदर्श संस्था पुरस्कार बहाल केला. 

         तात्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहिले. दुर्दैवाने सर्व संघर्षाचा सामना करत असताना तात्यांचा २० डिसेंबर २००९ रोजी मृत्यू झाला. जयभवानी सहकारी पाणी पुरवठा संस्थेबरोबरच कामधेनु दूध संस्था, जय भवानी हरितक्रांती सहकारी ग्रामीण पतसंस्था, भूविकास बॅंक या माध्यमांतून तात्यांनी जे काम केले आहे ते काम म्हणजे सहकार, समाजकारण व राजकारण या क्षेत्रांमध्ये नव्याने येण्याऱ्यांसाठी दीपस्तंभासारखे आहे.



         प्रा. एन.डी. पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली तात्या सक्रिय राहिले. एन.डी. पाटील सरांच्या त्या संघर्षमय आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात राज्यातील पाणी पुरवठा संस्थाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना व्याज माफीचा फायदा झाला. आमदार डॉ. विनय रावजी कोरे (सावकर) यांनी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून लाख मोलाचे सहकार्य केले. सावकर साहेबांनी संस्था चालवायला घेतल्याने संस्थेला पाठबळ मिळाले. मा.विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख साहेब व डॉ. विनयरावजी कोरे सावकर साहेब यांनी तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांना पाणी पुरवठा संस्थाना का? कर्जमाफी दिली पाहिजेल हे शासन दरबारी पटवून दिले. त्यानंतर कर्ज माफीचा मार्ग सुखकर झाला. प्रा. एन.डी. पाटील सर, मा.विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख साहेब, डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) साहेब, तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब या सर्वच व्यक्तिमत्त्वांच्या भक्कम पाठबळामुळे संस्था पुन्हा नव्या उत्साहाने सुरू झाली.

"श्री. जय भवानी सहकारी पाणी पुरवठा संस्था पश्चिम महाराष्ट्रातील तीन नंबरची संस्था तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक नंबरची संस्था म्हणून प्रसिद्ध तसेच नामांकित आहे."


धन्यवाद ! 























Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post